*सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे फायनान्शियल क्लोजर पूर्ण*
*सिडको मेट्रो प्रकल्पाकरिता आयसीआयसीआय बॅंकेकडून करण्यात येणार पतपुरवठा*
नवी मुंबई (प्रतिनिधी)
सिडको महामंडळ आणि इंडस्ट्रीअल क्रेडिट ॲन्ड इन्व्हेस्टमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (आयसीआयसीआय) बॅंक यांच्यात 25 नोव्हेंबर 2022 रोजी करार करण्यात येऊन या करारानुसार आयसीआयसीआय बॅंकेकडून सिडको नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 करिता रु. 500 कोटींचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे मेट्रो मार्ग क्र. 1 प्रकल्पाकरिताची फायनान्शियल क्लोजर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
याद्वारे *डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो प्रकल्पातील एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. याबाबत बोलताना डॉ. संजय मुखर्जी यांनी “आयसीआयसीआय बॅंकेकडून करण्यात येणाऱ्या रु. 500 कोटींच्या पतपुरवठ्यामुळे मेट्रो मार्ग क्र. 1 वरील कामांना गती मिळणार असून नियोजित वेळेत कामे पूर्ण होऊन लवकरात लवकर या मार्गावर प्रवासी वाहतूक करता येणे शक्य होणार आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे एकप्रकारे सिडकोच्या प्रकल्पांच्या विश्वासार्हतेवर मोहोर उमटविण्यात आली आहे,”* असे मत व्यक्त केले.

नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 वर 3 डब्यांची मेट्रो धावणार आहे. मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर हा 11.1 किमी लांबीचा व 11 स्थानके असणारा मार्ग आहे. या मार्गावरील व्हायडक्टचे काम पूर्ण झाले असून 11 पैकी 5 स्थानके प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज झाली आहेत. या मार्गाकरिता सीएमआरएससह सर्व महत्त्वाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित 6 स्थानकांचे काम वेगाने सुरू झाले असून संपूर्ण मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे.
मेट्रो मार्ग क्र. 1 करीता रु. 3,400 कोटी इतका खर्च अंदाजित असून त्यापैकी रु. 2,600 कोटींचा खर्च सिडकोकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. उर्वरित खर्च हा आयसीआयसीआय बॅंकेकडून करण्यात येणाऱ्या रु. 500 कोटींच्या पतपुरवठ्याद्वारे आणि सिडकोच्या अंतर्गत संचित निधितून करण्यात येणार आहे. नवी मुंबई अंतर्गत कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या दृष्टीने मेट्रोचे प्रकल्प महत्त्वाचा असून येथील नागरिकांना प्रवासाचा उत्तम पर्याय देण्यासह बांधकाम क्षेत्राला चालना देण्याकरिता हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावणार आहे.

