*सिडकोच्या जमिनीवर अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्या दोन डंपर चालकांवर कारवाई*
नवी मुंबई – सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमिनींवर अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्याचे प्रकार अलीकडे वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या डेब्रीजमुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत असून पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. सदर प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली.
दिनांक १३ मे २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास उलवे, नवी मुंबई येथील एमटीएचएल ब्रिजजवळील सेक्टर १२ अ, खारकोपर मास हौसिंग परिसरात दोन डंपर वाहनांमधून अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्याचा प्रयत्न करणारे चालक सईद कयाम रजा (वय २५, रा. अलेअदिस मस्जिद, कमलानगर, वडाळा, मुंबई) व बबलू दयाराम वर्मा (वय ३४, रा. वरळी कोळीवाडा, मुंबई) यांना सिडकोच्या तपास पथकाने रंगेहात पकडले.
त्यानंतर सदर प्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २७१ व ६२ अन्वये गुन्हा क्रमांक ००५६/२०२५ नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सिडको प्रशासन नागरिकांना आवाहन करत आहे की, सिडकोच्या अधिकृत वेबसाईट [www.cidco.maharashtra.gov.in](http://www.cidco.maharashtra.gov.in) किंवा संबंधित पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या अनधिकृत डेब्रीज टाकण्याच्या घटना तात्काळ कळवाव्यात, जेणेकरून संबंधितांवर कठोर कारवाई करता येईल.
सिडको परिक्षेत्रात स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणाचे संरक्षण राखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे.

