*पोटच्या लेकीचा खून; १२ तासांत निर्दयी बाप गजाआड, आळेफाटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई*
प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेचा अवघ्या १२ तासांच्या आत छडा लावत आळेफाटा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. स्वतःच्या चिमुकल्या लेकीचा निर्घृण खून करणाऱ्या बापाला पोलिसांनी तत्काळ अटक करत संवेदनशीलता, सतर्कता आणि तपास कौशल्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
दि. ०६ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मौजे संतवाडी ता. जुन्नर येथील पुणे-नाशिक महामार्गालगतच्या जंगल परिसरातून अंदाजे पाच वर्षीय मुलगा रडत बाहेर येताना स्थानिकांना दिसून आला. पोलिसांनी त्या मुलाची विचारपूस केली असता त्याने आपले नाव आर्यन सागर शिंदे असे सांगत, “वडील सागर शिंदे आम्हाला फिरायला घेऊन आले होते. रात्री जंगलात मला सोडून दिले आणि माझी लहान बहीण हर्षदा कुठे आहे हे माहिती नाही,” अशी धक्कादायक माहिती दिली.
या घटनेची गंभीर दखल घेत आळेफाटा पोलिसांनी तात्काळ मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. चौकशीत मुलाचे आजोबा सदाशिव शिंदे यांनी सागर शिंदे हा दोन्ही मुलांना फिरायला घेऊन गेल्याचे सांगितले. तसेच सकाळी घरी परतल्यानंतर त्याने मुलांना चाकण येथे असल्याचे खोटे सांगून कपडे घेऊन निघून गेल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, आरोपीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपी सागर शिंदे याने स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. तसेच मृतदेह पुणे-नाशिक महामार्गालगत फाउंटन हॉटेलसमोरील जंगलात फेकून दिल्याचे सांगितले.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला शोधमोहीमेच्या सूचना दिल्या. संपूर्ण जंगल परिसरात रात्रभर शोधमोहीम राबविल्यानंतर दि. ०७ मे रोजी चिमुकली हर्षदाचा मृतदेह जंगलात आढळून आला. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आळे येथे पाठविण्यात आला.
या प्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), १०९, ९३ व २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. मोशी, ता. हवेली, जि. पुणे) यास अटक करण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, श्रेणी पोलीस सहायक ई. टाव्हरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पोपट कोकाटे, विकास गोसावी, नविन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, प्रशांत तांगडकर व कांचन रानडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
अत्यंत संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा करून आरोपीला अटक करण्यात आळेफाटा पोलिसांना आलेले यश हे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे द्योतक मानले जात आहे.

