*लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांच्या नावाने मध्यवर्ती ग्रंथालयाचे नामकरण व्हावे; समाजसेवक निलेश कचरे यांचे प्रशासनाला निवेदन*
प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर-११ येथील भूखंड क्रमांक १ वर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक मध्यवर्ती ग्रंथालयाला “लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील मध्यवर्ती ग्रंथालय” असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी समाजसेवक निलेश छाया सोमाजी कचरे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे सविस्तर निवेदनाद्वारे केली आहे. समाजाच्या भावना, इतिहासाचा सन्मान आणि भावी पिढीसमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व उभे करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या मागणीचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारत असलेले हे अत्याधुनिक मध्यवर्ती ग्रंथालय नवी मुंबईच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, संशोधक, वाचनप्रेमी आणि विविध क्षेत्रातील अभ्यासकांसाठी हे ग्रंथालय आधुनिक ज्ञानकेंद्र म्हणून विकसित होणार आहे.
सुमारे १७७०.७३ चौ. मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या या ग्रंथालयात ई-ग्रंथालय, डिजिटल ज्ञानसंपदा, श्राव्य पुस्तके, भाषा प्रयोगशाळा, ब्रेल विभाग, अत्याधुनिक अभ्यासिका, समूह अध्ययन कक्ष, बालवाचन विभाग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र वाचन कक्ष, १३० आसनक्षमतेचे सभागृह, “पुस्तकांचा प्रवास” दर्शविणारे दृश्य दालन, पर्यावरणपूरक हरित वास्तू, छतावरील उद्यान, उपाहारगृह तसेच दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहेत.
समाजसेवक निलेश कचरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी संपूर्ण आयुष्य संघर्षात व्यतीत केले. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर त्यांनी उभारलेला लढा, समाजाप्रती असलेली निष्ठा आणि लोकहितासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. अशा थोर लोकनेत्याचे नाव या आधुनिक ज्ञानमंदिराला देणे ही त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले आहे.
समाजहिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणारे समाजसेवक निलेश कचरे यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, भूमिपुत्रांच्या भावना आणि सामाजिक इतिहासाचा विचार करून केलेली ही मागणी दूरदृष्टीपूर्ण आणि कौतुकास्पद असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. केवळ नामकरणाची मागणी न करता भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी, समाजाच्या संघर्षमय इतिहासाचे स्मरण कायम राहावे आणि ज्ञानमंदिराला लोकनेत्याचे नाव लाभावे, हा त्यामागील व्यापक सामाजिक दृष्टिकोन असल्याचेही नागरिकांचे मत आहे.
सदर निवेदनाच्या प्रती महापौर, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे तसेच शिक्षण विभाग प्रमुख यांनाही देण्यात आल्या असून आयुक्त कार्यालयाने या प्रस्तावावर पुढील कार्यवाहीसाठी अतिरिक्त आयुक्त आणि समाज विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन वर्ग केल्याची माहिती मिळाली आहे.
लोकभावना, भूमिपुत्रांचा इतिहास, सामाजिक योगदान आणि भावी पिढीला प्रेरणा देणाऱ्या मूल्यांचा सन्मान राखत “लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील मध्यवर्ती ग्रंथालय” या नामकरणास सकारात्मक मान्यता मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.



