*विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षिततेची साक्षरता प्रबळ करण्यासाठी वाशी वाहतूक शाखेचा जनजागृती उपक्रम*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करून भविष्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने वाशी वाहतूक शाखेतर्फे सेक्टर-१० येथील राजीव गांधी महाविद्यालयात वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी वाहतूक शाखा सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली हा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पोलीस नाईक शिरसाठ आणि पोलीस शिपाई दराडे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरण्याचे महत्त्व, वेगमर्यादेचे पालन, वाहतूक सिग्नलचे नियम, मोबाईलचा वापर करून वाहन चालविण्याचे दुष्परिणाम तसेच सुरक्षित वाहनचालक होण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवित सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः नियमांचे पालन करत आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारामध्येही वाहतूक सुरक्षिततेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास राजीव गांधी महाविद्यालयातील १०० विद्यार्थी आणि ४ शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांबाबत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षिततेची साक्षरता अधिक प्रबळ करण्यासाठी वाशी वाहतूक शाखेने राबविलेला हा उपक्रम समाजहिताचा आणि भविष्यात जबाबदार नागरिक घडविणारा स्तुत्य उपक्रम असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

