Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*घणसोलीत पाणीटंचाईचा उद्रेक; आठ दिवसांत तोडगा काढा, अन्यथा हंडा मोर्चा – राजू थोरातांचा इशारा*

*घणसोलीत पाणीटंचाईचा उद्रेक; आठ दिवसांत तोडगा काढा, अन्यथा हंडा मोर्चा – राजू थोरातांचा इशारा*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

घणसोली नोडमधील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून शेकडो नागरिकांना अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राजू थोरात यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना अंतिम आठ दिवसांचा अल्टिमेटम देत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा घणसोली विभाग कार्यालयावर नागरिकांच्या सहभागातून भव्य “हंडा मोर्चा” काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

घणसोली सेक्टर-१ मधील रामेश्वर सोसायटी तसेच परिसरातील रो-हाऊसमध्ये राहणारे शेकडो नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर पाणीटंचाईचा सामना करत आहेत. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अपुरा पुरवठा आणि वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि नोकरदार वर्गाला या समस्येचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रश्नासंदर्भात यापूर्वी अनेक वेळा लेखी तक्रारी, निवेदने आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, आजतागायत कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.

“पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची कायदेशीर तसेच नैतिक जबाबदारी आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,” असे राजू थोरात यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

आजपर्यंत लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या भूमिकेतून प्रशासनाशी संवाद साधत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अपेक्षित कार्यवाही न झाल्यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून या निवेदनाद्वारे प्रशासनाला अंतिम आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत रामेश्वर सोसायटी आणि परिसरातील पाणीपुरवठा नियमित, पुरेशा दाबाने आणि अखंडित सुरू न झाल्यास परिसरातील नागरिकांच्या सहभागातून घणसोली विभाग कार्यालयावर भव्य, शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने “हंडा मोर्चा” काढण्यात येईल, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.

राजू थोरात यांनी महापालिका आयुक्तांना तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्याची, प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. “अन्यथा संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून हंडा मोर्चा, धरणे आंदोलन आणि इतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या संदर्भात सहाय्यक आयुक्त वसंत मुंडावरे यांनी सांगितले की, “घणसोलीतील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत संबंधित पाणीपुरवठा विभागाला तात्काळ चौकशीचे निर्देश देण्यात येतील. चौकशी अहवालाच्या आधारे आवश्यक ती योग्य कार्यवाही करण्यात येईल.”

घणसोलीतील वाढती पाणीटंचाई ही केवळ एका परिसराची समस्या नसून नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित गंभीर विषय असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Related posts

*पोलीस-शाळा दत्तक योजनेतून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षिततेचे साक्षरता अधिक प्रबळ करण्यासाठी महापे वाहतूक शाखेचा स्तुत्य उपक्रम*

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबई पालिकेचीअनधिकृत होर्डिंग विरोधी कारवाई दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत प्रभावीपणे सुरू

APMC पोलिसांकडून अपघात झाल्याचे भासवून लुटणाऱ्यांना बेड्या

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment