Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*परदेशी जहाजावर नोकरीचे आमिष; १७ उमेदवारांची ४१.७५ लाखांची फसवणूक, दोन आरोपी अटकेत*

*परदेशी जहाजावर नोकरीचे आमिष; १७ उमेदवारांची ४१.७५ लाखांची फसवणूक, दोन आरोपी अटकेत*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : परदेशी जहाजावर आकर्षक पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून १७ उमेदवारांची तब्बल ४१ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुप्तवार्ता कक्ष (FIU), गुन्हे शाखेने तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या अनुषंगाने आर्थिक गुप्तवार्ता कक्षाने ही कारवाई केली.

आर्थिक गुप्तवार्ता कक्षाकडे डीजी शिपिंगकडे नोंदणीकृत असलेल्या डीएलएस मरीन कंपनीच्या नावाचा बोगस वापर करून परदेशी जहाजावर नोकरी देण्याचे आमिष दाखवत सहा उमेदवारांची १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची सखोल चौकशी करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गोरे, पोलीस शिपाई रविंद्र वंजारी आणि शेखर येवले यांनी आणखी ११ फसवणूकग्रस्त उमेदवारांचा शोध घेतला. त्यानंतर एकूण १७ उमेदवारांची ४१ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.

तपासात आरोपींनी डीएलएस मरीन सोल्युशन एलएलपी या नावाचा बोगस वापर करून एक्सव्हीएम शिपिंग कंपनीच्या सहाय्याने आणि ओसीयन स्पार्क शिप मॅनेजमेंट (ओपीसी) प्रा. लि.च्या माध्यमातून एजंटांमार्फत उमेदवारांना परदेशी जहाजावर उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखविले. उमेदवारांकडून लाखो रुपये स्वीकारल्यानंतर कोणालाही नोकरी उपलब्ध करून न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(५), ३१८(४), ३३६(३) व ६१(२) अंतर्गत १२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात मोहम्मद गुफरान बशीर काजी (वय २७, उलवे) आणि योगेश नाथाजी काळे (वय ३५, नेरूळ) या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

या तपासात आणखी काही फसवणूकग्रस्त समोर येण्याची शक्यता असल्याने, डीएलएस मरीन सोल्युशन एलएलपी, नेरूळ या नावाखाली नोकरीचे आमिष दाखवून ज्यांची आर्थिक फसवणूक झाली असेल, त्यांनी आर्थिक गुप्तवार्ता कक्ष (FIU), गुन्हे शाखा, पोलीस आयुक्तालय, सेक्टर-१०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे संपर्क साधावा किंवा ७७००९२०७६६ या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) प्रेरणा कट्टे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुप्तवार्ता कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गोरे, पोलीस शिपाई रविंद्र वंजारी आणि शेखर येवले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Related posts

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण- रायगड यांच्यामार्फत 23 ऑगस्ट ते 25ऑगस्ट पर्यंत आरोग्य शिबीर

अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला!

मुख्यमंत्री यांच्या हस्ते राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने म.रा मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांना सन्मानित

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment