Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

दिवाळीपूर्वी नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात २५ टक्के वाढ द्या; श्रमिक सेना युनियनची मागणी

दिवाळीपूर्वी नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात २५ टक्के वाढ द्या; श्रमिक सेना युनियनची मागणी

प्रतिनिधी:- जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या अधिकारी, कायमस्वरूपी कर्मचारी, अस्थायी कर्मचारी, कंत्राटी कामगार, ठोक मानधनावरील कर्मचारी, रोजंदारी कामगार, आशा सेविका आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मागील वर्षीच्या सानुग्रह अनुदानात २५ टक्के वाढ करून वाढीव रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी श्रमिक सेना अधिकारी कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात युनियनच्या शिष्टमंडळाने महापालिकेतील पदाधिकारी आणि आयुक्तांना निवेदन सादर केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासन, लेखा, कर, पाणीपुरवठा, अभियांत्रिकी, विद्युत, आरोग्य, पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, उद्यान, समाजविकास, शिक्षण, अग्निशमन, परिवहन (एनएमएमटी), आपत्कालीन व्यवस्थापन, नगररचना, जनसंपर्क यांसह विविध विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत आहेत. शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, सार्वजनिक सुविधा आणि नागरी व्यवस्थेचे कामकाज सुरळीत ठेवण्यात या सर्व कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आणि सामूहिक प्रयत्नांमुळे नवी मुंबईच्या विकासाला चालना मिळाली असून शहराला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

विशेषतः आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणाऱ्या आशा सेविका तसेच अंगणवाडी कर्मचारी यांचे योगदानही महत्त्वाचे आहे. मर्यादित मानधनात जबाबदारीने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत आशा सेविकांना दुप्पट अनुदान देण्याची मागणीही युनियनने केली आहे.

दिवाळी हा आनंदाचा आणि कुटुंबासोबत सण साजरा करण्याचा महत्त्वाचा उत्सव आहे. वाढती महागाई, घरगुती खर्च आणि कुटुंबाच्या विविध आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेता, महापालिकेतील सर्व संवर्गांतील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानात २५ टक्के वाढ मिळणे आवश्यक असल्याची भूमिका युनियनने निवेदनातून मांडली आहे. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांबरोबरच अस्थायी, कंत्राटी, करार पद्धतीवरील, ठोक मानधनावरील आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांचाही या मागणीत समावेश करण्यात आला आहे.

या मागणीसाठी श्रमिक सेना अधिकारी कर्मचारी युनियनच्या शिष्टमंडळाने उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, स्थायी समिती सभापती अशोक पाटील आणि महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना निवेदन दिले. दिवाळीपूर्वी मागणीचा सकारात्मक विचार करून सर्व संबंधित कर्मचारी वर्गाला वाढीव सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

या शिष्टमंडळात युनियनचे सरचिटणीस चरण जाधव, चिटणीस विजय साळे, अध्यक्ष राजूसिंग चव्हाण, उपाध्यक्ष सुनील गावित, सरचिटणीस रामकृष्ण चव्हाण, सचिव अभिनव सोळंके, रोहिदास पवार आणि रुपाली कुमावत यांच्यासह एनएमएमटीचे दिलीप भोईर, किशोर पाटील, सतीश बोराटे, संजय कोळी, अमोल भोसले, सतीश कोळी आणि विजय वेताळ उपस्थित होते.

महापालिकेच्या विकासकामांमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळणे, ही कर्मचाऱ्यांच्या हिताची आणि त्यांच्या श्रमाचा सन्मान करणारी बाब असल्याचे युनियनने अधोरेखित केले. आता या मागणीवर महापालिका प्रशासन आणि संबंधित पदाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्व कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Related posts

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या*

*पोटच्या लेकीचा खून; १२ तासांत निर्दयी बाप गजाआड, आळेफाटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई*

उपप्रादेशिक कार्यालय नवी मुंबई तर्फे वाहन चालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment