*पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईत परिसंवाद : शहर विकासात जनतेच्या अपेक्षांवर सखोल मंथन*
प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेस क्लब व नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने शहर विकासात सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेच्या अपेक्षा या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई येथे हा परिसंवाद होणार आहे.
जागर लोकशाहीचा, उत्सव निवडणुकीचा, अभिमान नवी मुंबईचा या संकल्पनेवर आधारित या परिसंवादाचे आयोजन मनोज जालनावाला अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य, नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
या परिसंवादात नवी मुंबई महापालिकेचे सेवानिवृत्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय पत्तीवार, सेवानिवृत्त शहर अभियंता डॉ. मोहन डगांवकर, माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर, बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे अध्यक्ष व विश्वस्त देवांग त्रिवेदी, स्त्रीमुक्ती संघटना तसेच नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या अध्यक्षा प्रा. वृषाली मगदूम आणि सा. आजची नवी मुंबईचे संपादक संजयकुमार सुर्वे आपले विचार मांडणार आहेत.
नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्य नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत आणि महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेला नेमके काय अपेक्षित आहे, यावर अनुभवी व तज्ज्ञ वक्ते सखोल मंथन करणार आहेत. मतदार राजा ठेव कर्तव्याचे भान, सशक्त लोकशाहीसाठी कर मतदान हा संदेश देत नवी मुंबईकर नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनोज जालनावाला यांनी केले आहे.

