**विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाशी येथे शाळा व महाविद्यालयांच्या प्रमुखांची आढावा बैठक**

वाशी, नवी मुंबई (२८ एप्रिल) – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी व तसेच शाळा-महाविद्यालयांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासंबंधी सूचना देण्यासाठी आज वाशी येथे विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
ही बैठक
परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे यांच्या अध्यक्षतेखाली सायं. ५ वाजता मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, सेक्टर ६, वाशी येथे ही बैठक पार पडली. परिमंडळ १ अंतर्गत येणाऱ्या १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १४९ शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विद्यालयांनी राबविलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, शाळांमध्ये लैंगिक अत्याचारास प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, शालेय व्यवस्थापन समित्या व स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. शासनाच्या विविध परिपत्रकांमध्ये नमूद करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य असून, सर्व शाळा व महाविद्यालयांनी थर्ड पार्टी ऑडिट करून त्याचा अहवाल संबंधित पोलीस ठाण्याला सादर करावा, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले.
या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत वाशी व मयूर भुजबळ तुर्भे विभाग तसेच परिमंडळ १ अंतर्गत सर्व १० पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारीही उपस्थित होते.

