Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

*उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल : “देशाला आज पंतप्रधानाची गरज आहे, फक्त भाजपाच्या नाही”*

उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल : “देशाला आज पंतप्रधानाची गरज आहे, फक्त भाजपाच्या नाही”

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली. “आज देशाला खऱ्या अर्थाने देशाभिमानी पंतप्रधान आणि जबाबदार गृहमंत्र्यांची गरज आहे. सध्याचे पंतप्रधान देशाचे नसून फक्त भाजपाचे पंतप्रधान आहेत, तर गृहमंत्री जनतेचे नव्हे, तर ‘घरफोड्यांचे’ नेतृत्व करत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “केंद्रात सरकार आल्यानंतर देशात पनवतीच सुरू झाली आहे. विमानतळांपासून मेट्रोपर्यंत सर्वच पायाभूत सुविधा कोलमडत चालल्या आहेत. प्रयागराज आणि दिल्ली येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांमध्ये निष्पाप लोक मृत्युमुखी पडले, परंतु कोणतीही जबाबदारी स्वीकारली जात नाही. नुकत्याच घडलेल्या विमान अपघातासंदर्भातही तेच चित्र पाहायला मिळाले.”

“शिवसेना संपणार नाही, उद्धव ठाकरे संपणार नाही”

शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, बापही चोरला, तरीही शिवसेना संपली नाही. कारण ही शिवसेना हृदयाशी बांधलेली आहे. आमचे शिवसैनिक पैसे टाकून तयार केलेले नाहीत, तर विचाराने भारलेले आहेत. ५९ वर्षांचा पक्ष आजही तरुण आहे आणि भविष्यकाळातही तरुणच राहणार आहे.”

पक्षातील गळतीवर भाष्य करताना ते म्हणाले, “आमच्या घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांनी स्वतःचा इतिहास पाहावा. जे आपला बाप बदलतात, ती माणसं राजकारणात टिकत नाहीत. किती माणसं घेऊन जायची तेवढी घेऊन जा, आमच्या विचारांची ताकद कोणीही हिसकावू शकत नाही.”

“आम्ही आहोत कट्टर देशाभिमानी हिंदू”

भाजपाच्या वचनपूर्तीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “मुख्यमंत्रीपदाबाबत आम्हाला दिलेला अडीच वर्षांचा शब्द त्यांनी पाळला नाही. मग जनतेला दिलेले आश्वासन तरी ते पाळतील का? भाजपाची वृत्तीच फसवणुकीची आहे. आम्ही मात्र कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. जो कोणी देशासाठी झटतो, तो आमचा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी नावे सुचवणाऱ्या भाजपाच्या खोट्या प्रचाराचे तोंड वेळीच उघड झाले पाहिजे,” असे ते म्हणाले.

“विरोधकांच्या जयघोषानेही कपडे ओले होतील”

कार्यक्रमातील वातावरणाचे वर्णन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “हे प्रेम आणि उत्साह कोणाच्याही नशिबात नाही. ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे आणि तुमचं प्रेम. विरोधकांनी इथे जयघोष पाहिल्यास त्यांच्या नॅपकिनसकट सगळे कपडे ओले होतील,” असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले की, शिवसेना केवळ एका पक्षाचे नव्हे, तर विचारांची लढाई आहे, आणि ती अजूनही तितक्याच ताकदीने सुरू आहे.

Related posts

*राजेंद्र बोडके यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई अध्यक्ष पदी निवड*

दबंग पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा ऑनलाईन पोलिस बदल्यांचा सुखद धक्का, व्हीसीव्दारे २५६ अंमलदारांच्या केल्या बदल्या… -*

जुन्नरमध्ये बिबट्याचे वाढते हल्ले गंभीर; आमदार शरद दादा सोनावणे यांची मंत्रालयात बैठक – वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन दिले

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment