*घणसोलीत रिक्षा भाडे वादातून तुफान हाणामारी; मध्यस्थी करणाऱ्या १८ वर्षीय युवकाची चाकू हल्ल्यात हत्या*
प्रतिनिधी :-जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई – घणसोली रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्थानकावर प्रवासी भाडे घेण्याच्या किरकोळ कारणावरून दोन रिक्षा चालक गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाची चाकू हल्ल्यात हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे घणसोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
मृत युवकाचे नाव आयान शेख (वय १८) असे असून तो घणसोली परिसरातील रहिवासी होता. या घटनेत त्याचा भाऊ आदिल शेख तसेच रिक्षा चालक राजेंद्र वाशीवाले हे देखील जखमी झाले आहेत. या प्रकरणी स्वप्नील सुर्वे, प्रमोद मानकर, सुभाष उर्फ सुब्या जाधव आणि सतीश उर्फ सत्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घणसोली रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्थानक परिसरात प्रवासी भाडे, रिक्षा क्रमांक आणि प्रवासी उचलण्यावरून चालकांमध्ये अनेकदा वाद होत असतात. रविवारी दुपारी प्रवासी घेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. यावेळी दगड, काठ्या आणि धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून आयान शेख हा वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी गेला होता. मात्र संतप्त आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत आयानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरात बंदोबस्त वाढवला. सुरुवातीला हत्येचा प्रयत्न आणि हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आयानचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्यात हत्येचे कलम समाविष्ट करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे आरोपींचा शोध घेत स्वप्नील सुर्वे आणि प्रमोद मानकर यांना अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेनंतर घणसोली स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांच्या दादागिरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी स्टेशन परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची तसेच रिक्षा स्थानकांवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.

