*पुणे ग्रामीणमधील अपघात रोखण्यासाठी ओतूर पोलिसांचा पुढाकार, १५-२०% अपघात कमी करण्याचे लक्ष्य*
प्रतिनिधी:-कैलास बोडके
ओतूर : पुणे ग्रामीण हद्दीतील वाढते अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने रोड सेफ्टी व वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून संपूर्ण विभागात महत्त्वाच्या ठिकाणी जनजागृतीपर सूचनाफलक लावण्याच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनने पुढाकार घेतला आहे. विशेषतः अपघातप्रवण क्षेत्रे, तीव्र वळणे, घाटरस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर तसेच महामार्गांवरील धोकादायक ठिकाणी हे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.
सूचनाफलकांवरील महत्त्वाचे संदेश :
- वेगावर नियंत्रण ठेवा, जीव वाचवा
- हेल्मेट तुमचे सुरक्षा कवच आहे
- सीटबेल्ट लावा, सुरक्षित राहा
- मद्यपान करून वाहन चालवू नका
- मोबाईलवर बोलत वाहन चालवणे टाळा
याबाबत बोलताना पोलीस प्रशासनाने सांगितले की, “केवळ दंडात्मक कारवाई करून अपघात रोखता येणार नाहीत, तर वाहनचालकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. हे सूचनाफलक वाहनचालकांना वारंवार सुरक्षिततेची जाणीव करून देतील.”
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढून अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी देखील वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

