Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

*सिडकोच्या विकासदृष्टीला नवे नेतृत्व; अश्विन मुद्गल यांनी स्वीकारला उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार*

*सिडकोच्या विकासदृष्टीला नवे नेतृत्व; अश्विन मुद्गल यांनी स्वीकारला उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या शहरी विकास आणि नियोजन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विन मुद्गल यांनी १७ जून २०२६ रोजी कार्यभार स्वीकारला. सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनमध्ये त्यांनी पदाची सूत्रे हाती घेतली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे सिडकोच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सिडकोमध्ये रुजू होण्यापूर्वी अश्विन मुद्गल हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) येथे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते. सन २००७ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी असलेल्या मुद्गल यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

नाशिक येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेची सुरुवात करणाऱ्या मुद्गल यांनी पंढरपूर-सोलापूर येथे उपजिल्हादंडाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे अध्यक्ष तसेच नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या मुद्गल यांना प्रशासन आणि विकास नियोजनाचा व्यापक अनुभव आहे.

कार्यभार स्वीकारल्यानंतर बोलताना अश्विन मुद्गल यांनी सिडकोच्या विकासात्मक भूमिकेवर भर देत सांगितले की, “सिडको हे देशातील अग्रगण्य नियोजन आणि विकास महामंडळांपैकी एक असून, संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत. सध्या सुरू असलेले सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेत आणि उच्च दर्जासह पूर्ण करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य राहील.”

सिडकोच्या नेतृत्वात झालेल्या या बदलामुळे नवी मुंबईसह राज्यातील विविध विकास प्रकल्पांना नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अश्विन मुद्गल यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली सिडकोची विकासगाथा अधिक वेगाने पुढे सरकेल, असा विश्वास प्रशासन व नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.

Related posts

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचा मनोज जरांगे पाटील यांना टोला.!

jantechasavdhanmaharashtra

वाशी प्लाझा सेक्टर 17 मधील हॉटेल गोल्डन सूट्स तसेच तेरझा लंग वर वाशी पालिकेची धडाकेबाज कारवाई

आशाताई बुचके यांचा भाजप प्रवेश,आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी:-..देवेंद्र फडणवीस

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment