*खराब झालेल्या चेंबरची तात्काळ दुरुस्ती; उपअभियंता रमेश गुरव यांच्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक*
प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई : नेरुळ विभागातील शिरवणे गाव परिसरात फुटपाथवरील चेंबर तुटल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. दिनांक १८ रोजी सायंकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आली. तुटलेल्या चेंबरमुळे पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता तसेच नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नेरुळ वार्ड कार्यालयातील स्थापत्य विभागाचे उपअभियंता रमेश गुरव यांच्याकडे तक्रार नोंदविली. नागरिकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत उपअभियंता रमेश गुरव यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला सूचना देत आवश्यक कार्यवाही सुरू केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच प्रशासनाने कार्यवाही करत दिनांक १९ रोजी दुपारपर्यंत फुटपाथवरील तुटलेले चेंबर दुरुस्त केले. त्यामुळे नागरिकांसाठी पादचारी मार्ग पुन्हा सुरक्षित व सुरळीतपणे खुला झाला. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे संभाव्य अपघाताचा धोका टळला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
स्थानिक नागरिकांनी उपअभियंता रमेश गुरव यांच्या कार्यतत्परतेचे आणि जबाबदार भूमिकेचे विशेष कौतुक केले. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करणारे अधिकारी समाजहितासाठी कार्यरत असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. शासन आणि प्रशासनातील अशा संवेदनशील व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही नागरिकांनी नमूद केले.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वेळेत केलेल्या या कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत उपअभियंता रमेश गुरव आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे आभार मानले. सार्वजनिक सुविधांच्या देखभालीबाबत दाखविलेली ही तत्परता समाजहितासाठी निश्चितच कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

