*पोलीस-शाळा दत्तक योजनेतून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षिततेचे साक्षरता अधिक प्रबळ करण्यासाठी महापे वाहतूक शाखेचा स्तुत्य उपक्रम *

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्
नवी मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करून भविष्यात जबाबदार, शिस्तप्रिय आणि सुरक्षित नागरिक घडविण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेमार्फत “पोलीस-शाळा दत्तक योजना : पोलीस बाल सुरक्षा अभियान” हा अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे, वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. राहुल खाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महापे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत अडवली-भुतवली येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १२३ येथे विशेष वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्रसिंग गिरासे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, रस्ता सुरक्षा, वाहतूक सिग्नलचे महत्त्व, झेब्रा क्रॉसिंगचा योग्य वापर, हेल्मेट व सीटबेल्टचे महत्त्व तसेच सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक नियमांची सोप्या, प्रभावी आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून माहिती देत प्रबोधन केले.
या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षिततेविषयी अधिक साक्षरता, स्वयंशिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना प्रबळ होत असून, सुरक्षित वाहतुकीची जाणीव त्यांच्या मनामध्ये दृढपणे रुजत आहे. शालेय वयात मिळणारे हे मार्गदर्शन भविष्यात जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असून, विद्यार्थ्यांमार्फत पालक आणि समाजातही वाहतूक नियमांविषयी सकारात्मक जनजागृती निर्माण होत आहे.
विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास, आपुलकी आणि सन्मानाची भावना निर्माण करण्याबरोबरच “पोलीस हा समाजाचा मित्र आहे” हा संदेश या अभियानातून प्रभावीपणे दिला जात आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ वाहतूक साक्षरतेपुरता मर्यादित न राहता सुरक्षित, सुसंस्कृत आणि जबाबदार समाज घडविण्यासाठी एक स्तुत्य व लोकहिताचा उपक्रम ठरत आहे.
डॉ. राहुल खाडे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेली “पोलीस-शाळा दत्तक योजना” ही सुरक्षित, अपघातमुक्त आणि शिस्तबद्ध नवी मुंबई घडविण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण सामाजिक पाऊल मानले जात आहे. या कार्यक्रमाबद्दल मनपा शाळेचे शिक्षक श्री. ………. यांनी महापे वाहतूक शाखेचे आभार मानत उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षिततेची साक्षरता अधिक प्रबळ करण्यासाठी राबविण्यात येत असलेला हा स्तुत्य उपक्रम भविष्यात अपघातमुक्त, शिस्तबद्ध आणि जबाबदार समाज घडविण्यास निश्चितच मोलाचे योगदान देईल, असा विश्वास नागरिक आणि शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

