Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*महिनाभरात वीज समस्या निकाली काढा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा*

*महिनाभरात वीज समस्या निकाली काढा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबईच्या वाशी-सानपाडा परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत नगरसेवक निशांत भगत यांनी आक्रमक भूमिका घेत महिन्याभरात समस्या निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. MSEDCL आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वय बैठकीत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

प्रभाग क्रमांक १८ मधील वाशीगाव, सेक्टर ३१, ३१ (ए) गावठाण विस्तार योजना परिसर, सानपाडा-सोनखार (पामबीच) तसेच वाशी सेक्टर १७ या भागात गेल्या महिनाभरापासून नागरिक आणि व्यापाऱ्यांना गंभीर वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विविध तांत्रिक कारणांमुळे १२ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित होत असून महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे खोदकाम, केबल दुरुस्ती आणि तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

यापूर्वी २९ एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिकेचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या उपस्थितीत MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वाढत्या उकाड्यात आणि वारंवार तक्रारी करूनही वीज ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निशांत भगत यांनी बैठकीत नमूद केले.

या बैठकीत वीज वितरण विभागाकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. वाशी-सानपाडा परिसरातील वीज समस्यांबाबत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी संयुक्त सर्वेक्षण करणार आहेत. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी अधिकारी, अभियंते आणि नागरी प्रतिनिधींचा व्हॉट्सअॅप समूह तयार करण्यात येणार आहे. तसेच वाशीगाव परिसरातील सहा डीपींचे इंटरलिंकिंग करून एका डीपीमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरू ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

याशिवाय अखंडित आणि स्थिर वीज पुरवठ्यासाठी आवश्यक आरएमयू (RMU) युनिट बसविणे, जुन्या व नादुरुस्त केबल वाहिन्या बदलणे तसेच जॉईंट्स मारलेल्या केबल्सची दुरुस्ती करण्याचे काम महिन्याभरात पूर्ण करण्यात येईल, असे ठोस आश्वासन वाशी विभागीय अधीक्षक अभियंता दिपक पाटील यांनी बैठकीत पोलिसांसमक्ष दिले.

नगरसेवक निशांत भगत यांनी बैठकीदरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्याकडे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी सहकार्याची मागणी केली. तसेच MSEDCL ने दिलेल्या मुदतीत सर्व कामे पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केल्यास संबंधित अधिकारी व अभियंत्यांचा सत्कार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या समन्वय बैठकीस नगरसेविका प्रिती संदीप भगत, वितरण मंडळाचे अधिकारी व अभियंते, समाजसेवक संदीप भगत तसेच प्रभागातील नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.

Related posts

*जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्रा तर्फे कोव्हिड योद्धांचा सन्मान*

jantechasavdhanmaharashtra

*वाशी वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; २०२६ मध्ये लाखोंचा दंड वसूल, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई*

पीएम किसान ई-केवायसीला मुदतवाढ ..! लाभ घेण्याचे तहसिलदार अमोल निकम यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Leave a Comment