*ऐरोलीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा बुलडोझर; कारवाईत अडथळा आणणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई : शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली परिसरात धडक कारवाई सुरू ठेवली असून, या कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ॲड. किशोर शेट्टी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिका क्र. सीपी/६८५/२०२५ मध्ये विनापरवानगी उभारण्यात आलेल्या इमारतींची छायाचित्रे न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्याआधारे संबंधित अनधिकृत बांधकामांना तसेच इतर सुरू असलेल्या अनधिकृत इमारतींना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. संबंधितांनी स्वतःहून बांधकाम हटविणे अपेक्षित असतानाही अनधिकृत काम सुरूच ठेवण्यात आल्याने महापालिकेने कठोर भूमिका घेत कारवाईची मोहीम राबविली.
या मोहिमेंतर्गत २८ जुलै रोजी ऐरोली विभागातील १३ आणि २९ जुलै रोजी आणखी ६ अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली. सेक्टर २, ऐरोली येथील प्रीती सोसायटीमधील घर क्रमांक १०, ११, १२ आणि १३ या ठिकाणी कारवाई सुरू असताना काही व्यक्तींनी महापालिकेच्या पथकाला विरोध करत शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
यावेळी विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त साधना पाटील आणि महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असताना संबंधितांकडून शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच मारहाणीचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अक्षय मोरे, दीपक पहुरकर, राजेश राठोड, विशाल टोणगे, सागर अलाकुटे, हर्षल बागुल, जावेद खान, संदीप शिंदे, संदीप मोहिते आणि अन्य २० ते २५ जणांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नियोजनबद्ध विकास, नागरिकांची सुरक्षितता आणि कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार असून, शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर पावले उचलली जातील, असा स्पष्ट संदेश महापालिकेने दिला आहे.

