सिडकोचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित : पावसाळ्यात २४x७ सेवा
नवी मुंबई : पावसाळी कालावधीत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सिडको महामंडळातर्फे आपत्कालीन नियंत्रण कक्ष दिनांक २६ मे २०२५ पासून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत २४x७ कार्यान्वित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सिडकोच्या अधिकार क्षेत्रातील नागरिकांना तत्काळ मदत आणि सेवा पुरवण्यासाठी या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
आज सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी श्री. सुरेश मेंगडे यांनी या नियंत्रण कक्षाचा आढावा घेतला. त्यांनी सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनच्या तळमजल्यावर स्थित असलेला हा नियंत्रण कक्ष कार्यालयीन दिवसांसह शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही २४ तास कार्यरत राहणार आहे.
या कक्षामार्फत अभियांत्रिकी, आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा, उद्यान आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने संपर्कात राहतील. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सर्व आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले आहे.
नियंत्रण कक्षामार्फत खालीलप्रमाणे आपत्कालीन घटनांवर कार्यवाही केली जाईल :
- वृक्ष पडणे किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांची छाटणी
- रस्त्यावरील उघड्या गटारांचे झाकण लावणे
- पूर किंवा पूरजन्य परिस्थिती
- रस्ते व नाल्याजवळ साचलेला कचरा, खड्डे
- पाण्यात बुडण्याची घटना
- आग व आगीचे प्रकार
- साथीचे रोग, विषारी प्राणी चावणे
- इमारत कोसळणे, भूस्खलन, पाणी साचणे इत्यादी
नागरिकांनी अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पुढील माध्यमांद्वारे सिडको नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा :
संपर्क क्रमांक :
- दूरध्वनी : 022-67918383 / 8384 / 8385, 022-27562999
- व्हॉटसअॅप : 8655683238
- टोल फ्री : 18002664098
- फॅक्स : 022-67918199
- ई-मेल : eoc@cidcoindia.com
सिडको प्रशासनामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वरील संपर्क माध्यमांचा वापर करून त्वरित माहिती द्यावी व सहकार्य करावे.

