**सिडकोच्या कळंबोली नोडमध्ये अतिक्रमण विरोधी मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी**
दिनांक 28 मे 2025 रोजी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागामार्फत कळंबोली नोडमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत सिडको अधिसूचित क्षेत्रातील सेक्टर 23 मधील भूखंड क्रमांक HP1 (Holding Pond) आणि 206 येथील नवी मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या 2042 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील सुमारे 200 तात्पुरती अतिक्रमणे तसेच मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.
सदर अतिक्रमणे सिडको महामंडळाच्या प्रचलित नियमावली व धोरणांचे उल्लंघन करून तसेच सिडकोकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती. त्यामुळे ती निष्कासित करणे आवश्यक होते.
ही मोहीम मा. मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार व मा. मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेत सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी, सिडको पोलिस पथक, महावितरण विभाग, सिडकोचे सुरक्षा रक्षक व महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे रक्षक यांचा सक्रिय सहभाग होता.
मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 4 जेसीबी, 4 ट्रक, 20 जीप आणि 50 कामगारांची मदत घेण्यात आली. सिडको प्रशासनाकडून भविष्यातही अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

