Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जुन्नर तालुक्यातील साहित्यिक”पहिले सीए.डॉ.एन.बी.चव्हाण यांची जीवन कथा

                         दशरथ चव्हाण प्रतिनिधी

 

जुन्नर तालुक्यातील एका अतिसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यानंतर शेतमजूर, रात्रशाळा, फेरीवाला, सकाळचे काॅलेज, दुपारी मिळेल ते काम, सहकारी बँकेतील तात्पुरता क्लार्क, क्लार्क, रोखपाल, हिशोबणीस, सहाय्यक मॅनेजर, अंतर्गत हिशेब तपासणीस, सरकारी ऑडिटर असा खडतर प्रवास करत भारतात ‘सीए’ परिक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तिर्ण होऊन गुणवत्ता यादीत स्थान. पंधरा नामवंत कंपन्यांची उच्च पदे आणि पगाराच्या नोकरीच्या ऑफर हातात असूनही शिक्षणाचा आपल्या समाजासाठी उपयोग. मराठी साहित्यात अनेक विचारवंतानी वाखाणलेली ‘जीवनशास्त्र’ ही भगवद् गीतेवरील भाष्य करणारी चौदाशे पानांची निरूपणात्मक ग्रंथनिर्मिती आणि एकूण तेवीस प्रकाशित साहित्यकृतींच्या गौरवार्थ ‘मानद डॉक्टरेट’ असा संघर्षमय पण दैदिप्यमान जीवनप्रवास असलेले सीए. डॉ. एन. बी. चव्हाण म्हणजे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श व्यक्तिमत्व आहे. सीए. डॉ. एन. बी. चव्हाण यांनी ‘समत्ववादी सम्राट खंडेराय’ हा कुलस्वामी खंडेरायांवर प्रथम संशोधनात्मक ग्रंथ लिहिला असून तो इंग्रजी भाषेतही प्रकाशित झाला आहे. पराकोटीच्या संघर्षातून परिस्थितीवर मात करत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मिक उन्नतीचा प्रशस्त राजमार्ग निर्माण करता येतो अशी सीए. डॉ. एन. बी. चव्हाण यांची स्फूर्तीदायी यशोगाथा आहे.
शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या परिसरातील मीना नदीच्या तीरावर वसलेल्या छोट्याशा वडज गावातील देऊबाई आणि बाबुराव चव्हाण या कष्टकरी जोडप्याच्या एकूण चौदा अपत्यांपैकी चौथे अपत्य नामदेव याचा जन्म २ फेब्रुवारी १९४३ रोजी झाला. नामदेवचे आजोबा कृष्णाजी संतुजी चव्हाण हे त्याकाळी चौथीपर्यंत शिकलेले होते. मुंबईत फळांचा, केळीचा व्यापार करणा-या कृष्णाजींनी प्रकृतीच्या कारणास्तव १९४८ साली मुंबई कायमची सोडली अन् गावी मुलगा बाबुराव आणि नातवंडांबरोबर शेती करू लागले. मुलगा बाबुराव फारसा शिकला नव्हता तरी आपल्या नातवंडानी शाळेत जावे, खूप शिकावे ही कृष्णाजींची इच्छाच नाही तर हट्ट होता. गरीब परिस्थितीमुळे आई, आजीचे सर्व दागिने सावकाराकडे गहाण ठेवून झाले होते, किंमती वस्तू, तांबे-पितळेची भांडीही विकली, गावातील चार खणांचे जुने घर विकले होते असे आठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरातील मुलांनी शिक्षण तरी कसे घ्यावे? पावसाळ्यात तीन महिने घरच्या कोरडवाहू शेतात आणि बाकी नऊ महिने आजीआजोबा, आईवडीलांबरोबर मोलमजुरी व फावल्या वेळात शाळा अशी नामदेव आणि मोठा भाऊ ज्ञानेश्वर यांच्या शाळेची परवड सुरू होती. काबाडकष्ट करणारे, हाडाची काडं करणारे आजोबा कृष्णाजी दोन्ही नातवांना शेतातील खळ्यावर रात्रीच्या चांदण्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे, नातवांकडून ‘आकारकी’ पाठ करून घ्यायचे.
वडज गावातील मारुती मंदिरात भरणा-या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत नामदेव हुशार विद्यार्थी म्हणून गणला गेला तेंव्हा आजोबा कृष्णाजींची छाती अभिमानाने फुलून आली. छोटा नामदेव म्हणजे कृष्णाजींसाठी, ‘नातु म्हणजे काय, दूधावरची साय’ असा नाजुक मायेचा हळवा कोपरा होता, तर वारकरी पंथाचे साधक असलेले भाविक आणि सात्विक वृत्तीचे आजोबा कृष्णाजी हे नामदेवसाठी जगातील सर्वात हुशार व्यक्ती, संतविचार शिकविणारे मार्गदर्शक आणि आदर्श झाले होते. कृष्णाजींच्या विचारांचा, चारित्र्याचा, संस्कारांचा व व्यक्तीमत्वचा प्रभाव नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या मनावर खोलवर पडला होता. आजोबा कृष्णाजींनी त्याकाळी नोंदवहीत करून ठेवलेल्या सर्व नातवंडांच्या जन्म तारखांची नोंदच शाळेच्या दाखल्यातही आढळते. वडजच्या कुलस्वामी खंडेरायाची पूजा आजोबा कृष्णाजींकडे होती. खंडेरायावर या कुटुंबाची अपार श्रद्धा होती व आहे. ‘कुलस्वामी खंडेराय आमचा योगक्षेम चालवतो’ अशी आजोबांची शिकवण होती. आजोबांना पूजेसाठी मीना नदीतून पाणी आणून देणे, फुले देणे हा नामदेवचा नित्यक्रम होता. महिनोंमहिने सरकारने दिलेल्या ‘लाल ज्वारीचा घाटा’ किंवा उकडलेली रताळे खाऊनही दारिद्रय असलेल्या या घरात सुख, शांती व समाधानाचा सुगंध दरवळत होता. उद्याची चिंता खंडेरायावर टाकून फाटक्या संसाराला ठिगळं लावण्याचे काम आजोबा कृष्णाजी आनंदाने करीत होते.
पारूंडे येथील शाळेत पाचवी व सहावी उत्तिर्ण झाल्यानंतर शेतमजूर म्हणून ज्या शेतकऱ्याकडे रोज काम करीत होता त्याच शेतक-याकडे नामदेव ‘सालगडी’ म्हणून राहिला. परिणामी शाळेत हजेरी लागत नव्हती, शाळा सोडावी लागली, शिक्षण बंद झाले. ह.भ.प. रामदासबाबा मनसुख यांनी स्थापन केलेल्या ‘ज्ञानमंदिर’ या वारकरी शिक्षण संस्थेत नामदेवने भजन, किर्तन, प्रवचन यांचा अभ्यास करावा असे आजोबांना वाटत होते. विहीर खोदकाम, दारू भरण्यासाठी खडक फोडणे, नांगरणी, पेरणी, कोळपणी, खुरपणी, वाफे बांधणी, मोटा हाकणे इत्यादी मजुरीची कामे नामदेव करत होता. अशातच बालमित्र ‘रमण’ याचे ‘मुंबईला निघून ये, फुलांच्या दुकानात काम आहे’ असे पत्र नामदेवला मिळाले. आयुष्यातील बारा वर्षांची तपश्चर्या संपवून नामदेव उत्साहाने मुंबईत दाखल झाला. घोडपदेव, धाकू प्रभूची वाडी येथील नाक्यावर एका जेमतेम ५० चौरस फुट दुकानात भुलेश्वर येथून फुले आणणे व फुलपुडी किंवा हारपुडी बांधून ठरलेल्या गि-हाईकाच्या खोलीवर नेऊन देण्याचे काम नामदेव आवडीने करु लागला. हळूहळू फुटपाथवर स्वतः फुलांचा व्यवसाय सुरू केला, पावसाळ्यात हातगाडीवर फुले विकली. फुलांचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली पसरट पाटी घेतली, वेगवेगळी ताजी कळ्यांची फुले आणून गजरे, वेण्या बनविल्या, गल्लोगल्ली जाऊन विकल्या. एके दिवशी बारा रूपये नफा झाला. सहाअणे, आठअणे कष्टाच्या मजुरीपेक्षा कितीतरी जास्त.. तोही मालक म्हणून! नामदेवला आजीआजोबा, आईवडीलांबरोबरच इतर भावंडांचीही आठवण झाली. फुलांच्या व्यापारातून एक ‘जीवनसत्य’ नामदेवला सापडले.
‘फुलांचे जीवन असते एका दिवसाचे।
आनंद देऊनिया जाते नाही पहात उद्याचे॥
घेवो सुगंध दुर्जन वा संत।
न ठेवी अपेक्षा न मानी खंत॥’
हेच जीवनसूत्र मनी धरून वाटचाल सुरू ठेवल्याने नामदेवच्या विचारात विलक्षण बदल घडला. पावसाळ्यात फेरी व्यवसाय बंद झाल्याने पुन्हा अडीच रूपये मजुरीने एका फुलांच्या दुकानात नामदेव काम करू लागला. एकदा मालकाच्या मुलाची बाकड्यावर पडलेली पुस्तके वाचत असताना माधवराव शिंदे नावाच्या गृहस्थाने, ‘तू रात्रशाळेत का जात नाहीस, मी सुद्धा नोकरी करत असताना रात्रशाळेत जाऊन एम.ए. पर्यंत शिक्षण घेतले आहे’ असे सुचविले. नोकरी किंवा व्यवसाय करत विद्यार्थी म्हणून शिक्षण घेता येते हे नामदेवला प्रथमच समजले. पुढे यथावकाश या माधवराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाने नामदेवची रात्रशाळा सुरू झाली. गिरगावची अभिनव नाईट स्कूल, माझगाव नाईटस्कूल, ठाकूरद्वारची नॅशनल नाईटस्कूल, कधी दुकानात, कधी फेरीचा फूलधंदा, कधी हातगाडी, जेवायला एका ठिकाणी, झोपायला दुसरीकडे, अंघोळीला तिसरीकडे अशा अनेक अडथळ्यांवर मात करत करत रात्रशाळेत अकरावी म्हणजे जुन्या एस्.एस्.सी. परिक्षेत नामदेव बाबुराव चव्हाण हा विद्यार्थी ५८% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. ‘बाबा, तुमचा लाडका नातु एस्.एस्.सी. परिक्षेत उत्तीर्ण झाला आहे, तुमचे स्वप्न साकार झाले आहे’ असा संदेश आपल्या आजोबांना पाठविण्यास नामदेव विसरला नाही.
अनेकांकडून कौतुक होत होते पण नामदेवला दुस-या दिवशीच्या जेवणासाठी काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हती. आता ‘स्टेटस्’ मुळे पूर्वीचे धंदे करावेत की नाही असाही प्रश्न होता. भुलेश्वरचे फूलव्यापारी श्री. दावल वळसे यांनीही कौतुक करूत त्यांचे हिशोब लिहीण्याचे काम नामदेवला दिले. वाणिज्य (काॅमर्स) अभ्यासक्रमाची पदवी घेतली तर चांगली नोकरी मिळेल असा विचार करून नामदेवने सिद्धार्थ काॅलेजमध्ये सकाळच्या वर्गात प्रवेश घेतला. इंग्रजी भाषा समजत नव्हती तरी सकाळचे काॅलेज, दुपारी हिशोब लिहीण्याची कामे आणि रात्री अभ्यास असा नामदेवाचा दिनक्रम चिकाटीने सुरू होता. काॅलेजच्या दुस-या वर्षात असताना श्री. गणपतराव ढोलेमामा यांनी मराठा बॅंकेच्या लवाद केसेस् न्यायालयात सादर करण्यासाठी संचालकांच्या परवानगीने सहाय्यक म्हणून नामदेवला बोलवले. यानंतर कार्यकारी संचालकाने ‘सांगकाम्या सेवक’ म्हणून नामदेवची नेमणूक केली आणि नामदेवचा मराठा बॅंकेच्या सेवेत प्रवेश झाला. हळूहळू नामदेवने बॅंकेच्या हिशोब पद्धतीत लक्ष घालून संचालकांचा विश्वास संपादन केला.’ज्युनिअर व सिनियर’ बी.काॅम. या दोन्ही परिक्षा नामदेव प्रथम प्रयत्नात उत्तिर्ण झाला आणि मराठा बॅंकेचा उपमुख्यअधिकारी म्हणून त्याला बढती मिळाली. बॅंकेच्या हिशोब तपासणी करण्यासाठी येणा-या श्री. देसाई यांनी नामदेवला सीए. होण्याचा सल्ला दिला. परंतु सीए. ही उच्च पदवी प्राप्त करण्यासाठी असलेला अभ्यासक्रम अवघड असून तुझे शिक्षण रात्रशाळेत व सकाळच्या काॅलेजात झाले असल्याने तुला हा अभ्यासक्रम झेपणार नाही असे मत अनेकांनी व्यक्त केले. परंतु ‘पदवी प्राप्त झाली नाही तरी चालेल, अभ्यासक्रम पूर्ण करायचाच.’ असा नामदेवने निर्धार केला.
सकाळी – संध्याकाळी आणि रविवारी बॅंकेचे काम व मधल्या वेळेत अनुभव अभ्यासासाठी मे. एम्. पी. चितळे फर्म अशी तारेवरची कसरत नामदेव करत होता. त्या काळात समाजामध्ये सीए. पदवी प्राप्त केलेली व्यक्ती आढळत नव्हती, अभ्यास करणारा कोणी विद्यार्थीही नव्हता. सीए. फायनल परिक्षेसाठी नामदेवने बॅंकेकडून दोन महिन्यांची रजा घेतली. श्री. ज्ञानेश मनसुख यांनी स्वतःच्या घरी जेवणाची सोय केली होती, तेथूनच जवळ अभ्यासासाठी स्वतंत्र खोली घेतली होती. सीए. फायनल परिक्षा १ नोव्हेंबर १९७० रोजी सुरु झाली. फायनल सीए.चा अभ्यास म्हणजे नामदेवने केलेली एक साधना होती. जानेवारी १९७१ मध्ये सीए. फायनल परिक्षेचा निकाल जाहीर झाला. खंडेरायाच्या कृपेने श्री. नामदेव बाबुराव चव्हाण दोन्ही विभागात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. दुस-या दिवशी इकाॅनाॅमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या सीए.च्या निकालात एन. बी. चव्हाण हे नाव भारतातील पहिल्या पन्नासमध्ये गुणवत्ता यादीत होते. मराठा बॅंकेचे संचालक मंडळ तसेच सर्व नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू होता. नवशक्ती व शिवनेर या वर्तमानपत्रात नामदेवच्या फोटोंसह यशाची बातमी छापून आली होती. तोपर्यंत जुन्नर तालुक्यात कोणीही सीए. पदवी प्राप्त केल्याचे ऐकिवात नव्हते. कदाचित श्री. नामदेव बाबुराव चव्हाण उर्फ एन. बी. चव्हाण हेच जुन्नर – आंबेगाव परिसरातील पहिले सीए. असावेत. एन. बी. चव्हाण यांना जुलै १९७१ मध्ये पदवीपत्र मिळून कायदेशीर अधिकार प्राप्त झाले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट संस्थेचा सभासद क्रमांक १२७७५ मिळाला. याचा अर्थ हा अभ्यासक्रम १९४९ साली सुरू झाल्यापासून गेल्या बावीस वर्षीत प्रतिवर्षी फक्त ५८० व्यक्ती सीए. परिक्षा उत्तीर्ण होत होत्या. भारतातील पंधरा प्रसिद्ध व मोठ्या कंपन्यांनी सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांना सर्वाधिक पगाराची व अधिकारपदाची प्रलोभने असलेली निमंत्रणे पाठवली होती. नोकरी करून मिळणाऱ्या पगारापेक्षा स्वतंत्र व्यवसाय करून पैसे कमी मिळाले तरी स्वातंत्र्यात व आनंदाने राहू हा अंत:करणातील दिव्यशक्तीचा कौल सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांनी स्विकारला. मंचर येथील श्री. शंभू ग. खानदेशे यांची बी.ए. शिकलेली, मुंबई महापालिकेत नोकरीस असलेल्या ‘शारदा’ या कन्येशी सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांचा १९७१ साली विवाह झाला. दैनिक शिवनेरचे संपादक मा. विश्वनाथराव वाबळे यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री कै. बाळासाहेब भारदे या विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. विवाहनंतर हे नवदाम्पत्य कुलस्वामी खंडेराय व थकलेल्या आजोबांच्या दर्शनासाठी वडज गावी गेले असता गावक-यांनी व तरुणांनी खंडेराय मंदिरापासून सजवलेल्या बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढली. अशाप्रकारे अभिमानास्पद आणि आदरयुक्त स्वागताने सीए. श्री. एन. बी. चव्हाण भारावून गेले. यानंतर व्यवसायाबरोबरच गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात सीए. श्री. एन. बी. चव्हाण नेहमीच अग्रेसर राहिले. मराठा सहकारी बँक, मराठा मार्केट पिपल्स को – ऑप बॅंक यांचे अंतर्गत हिशेब तपासणीस आणि सल्लागार म्हणून काम करण्याची संधी सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांना मिळाली. यामुळे श्री. बाबुराव शेटे, श्री. गुलाबराव शेळके, श्री. तात्यासाहेब देशपांडे अशा सहकारातील दिग्गजांचा सहवास व मैत्री सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांना लाभली. जुन्नर तालुक्यातील राजकारणात सक्रिय होऊन सीए. डॉ. एन. बी. चव्हाण यांनी विधानसभा निवडणुक लढवावी अशी त्यावेळी अनेकांची इच्छा होती. परंतु सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवत त्यांनी समाजासाठी सर्वोतोपरी योगदान देण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतील अनेक नावाजलेल्या सामाजिक संस्थांशी सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांचा जवळून संबंध आला. श्री. कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे हिशेब तपासणीस, व्यवस्थापन आणि सल्लागार म्हणूनही सीए. श्री. एन. बी. चव्हाण महत्वपूर्ण भूमिका बजावत होते. चार्टर्ड अकाउंटंटच्या व्यवसायात अनेक संस्थांना मार्गदर्शन करून बंद झालेल्या संस्था व कंपन्या त्यांनी पुनर्जीवित केल्या. दुरदर्शनवरील ‘अमृताचा वेलू’ या कार्यक्रमात श्री. एन. बी. चव्हाण यांची मुलाखतही घेण्यात आली होती. ह.भ.प. वै. संत सहादुबाबा वायकर महाराज गुरूवर्य ह.भ.प. वै कोंडाजीबाबा डेरे, ह.भ.प. रामदासबाबा मनसुख, ह.भ.प. गुलाबमहाराज खालकर इत्यादी वारकरी संप्रदायातील महाराजांचे आचरण सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांनी लहानपणापासून जवळून पाहिले होते. गुरूवर्य ह.भ.प. वै. कोंडाजीबाबा डेरे हे पुढे सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांचे वारकरी संप्रदायातील गुरूच झाले. स्वामी मोहनानंद गिरी महाराज यांचेबरोबर त्यांचा विशेष स्नेह होता. अनेक किर्तनकारांच्या प्रोत्साहनामुळे वारकरी संप्रदायाचे ‘भक्तजन’ हे मासिक एनबींनी सुरू केले होते.
अध्यात्मिक आवड आणि कुलस्वामी खंडेरायावरील अपार श्रद्धेतूनच १०८ ओव्यांचे ‘वडज खंडेराय महात्म्य’ सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांचेकडून लिहून झाले. कुलस्वामी खंडेराय या दैवताचा सात वर्षे संशोधनात्मक अभ्यास करून ‘समत्ववादी सम्राट खंडेराय’ हा खंडेरायांचा लीलाग्रंथ सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांच्याकडून पूर्णत्वास गेला. हा ग्रंथ इंग्रजी भाषेतही प्रकाशित झाला आहे. जीवनातील अनुभव, आठवणी व अनुभूतींचा संग्रह असलेली ‘पांधी – प्रकाशन २००८, अनुभूती – प्रकाशन २०११, स्मृती सुमने – २०१८’ ही पुस्तकेही प्रकाशित झाली. ‘आनंदयात्रा’ हे सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांचे आत्मचरित्र प्रकाशित असून त्याला ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वरमहाराज थोरात यांची प्रस्तावना लाभली आहे. स्वतःच्या अध्यात्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी भगवद् गीतेचा अभ्यास करताना भगवद् गीतेचे ‘जीवनशास्त्र’ म्हणून सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांना दर्शन झाले. यातूनच प्रतिभादेवी प्रसन्न होऊन प्रत्येक श्लोकाचे निरूपण प्रकट झाले. या निरूपणांचीच ‘जीवनशास्त्र’ ही चौदाशे पानांची ग्रंथनिर्मिती झाली. सीए. श्री. एन. बी. चव्हाण यांची एकूण तेवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
‘जीवनशास्त्र’ या ग्रंथाचा प्रचार होऊन ग्रंथाच्या अभ्यासातून ‘डाॅक्टर ऑफ लिटरेचर’ ही पदवी Inox International University ने सीए. डॉ. एन. बी. चव्हाण यांना सन्मानपूर्वक प्रदान केली. अनेक विचारवंतांकडून ‘जीवनशास्त्र’ हा ग्रंथ वाखाणला गेला आहे. डॉ. निलेश झगडे, चाकण यांनी ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वरमहाराज थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सीए डॉ. एन. बी. चव्हाणकृत साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ हा प्रबंध जे.जे.टी. विद्यापीठ, झुनझुन, राजस्थान येथे सादर केला. त्यांना दि. २३ एप्रिल २०१८ रोजी पीएच.डी. (डाॅक्टरेट) पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी न्याय महासंघाचे राष्ट्रीय सेक्रेटरी म्हणूनही सीए. डॉ. एन. बी. चव्हाण यांची निवड झाली होती. गेल्या पन्नास वर्षांच्या काळात कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट, वडज या संस्थेत विविध पदांवर सेवा समर्पित करताना सामुदायिक विवाह सोहळे, आय. टी. आय स्थापना, माध्यमिक विद्यालय स्थापना, गुरूकुल अशा सर्व संकल्पना पूर्णत्वास जाताना सीए. डॉ. एन. बी. चव्हाण यांचे अनमोल योगदान राहिले. कुलस्वामी को – ऑप क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेच्या स्थापनेपासूनच सीए डॉ. एन. बी. चव्हाण महत्वाचे आधारस्तंभ राहिले आहेत. वडज या आपल्या जन्मगावी वृंदावन आश्रम आणि श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना सीए डॉ. एन. बी. चव्हाण यांनी केली आहे.
अध्यात्मिक, साहित्य, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, सहकार व शिक्षण या विविध क्षेत्रात सीए. डॉ. एन. बी. चव्हाण यांनी केलेले कार्य गौरवास्पद आणि आदर्शवत आहे. समाजासाठी एवढे मोठे योगदान देत असताना कौटुंबिक जबाबदारी मात्र पत्नी शारदा यांनी समर्थपणे सांभाळली. आपल्या माधुरी, दिपाली, पद्मिनी या तीनही कन्यांचे बालपण, शिक्षण, संस्कार यामध्ये पत्नी शारदाने कधीही कुरबूर केली नाही. म्हणूनच २ फेब्रुवारी २०१८ रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण होत असताना या दांपत्याचा ‘कृतज्ञता सोहळा’ महामंडलेश्वर श्री. महंत विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्ण लहवीतकर महाराज यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या दांपत्याची एक मुलगी डाॅक्टर तर दोन मुली सीए झाल्या. दूर्दैवाने दिपाली यांना २०१६ मध्ये कर्करोगाची बाधा झाली. चव्हाण परिवाराने शर्थीचे प्रयत्न केले पण १६ डिसेंबर २०१९ रोजी दिपालीने या जगाचा निरोप घेतला. मोठी माधुरी चव्हाण – जोशी गझलकार असून आपल्या वडिलांचा साहित्यिक वारसा जपत आहेत तर छोटी पद्मिनी सचिन म्हात्रे व्यवसाय संभाळत आहेत. प्रेरणादायी व्यक्तिमत्व सीए. डॉ. एन. बी. चव्हाण आता वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी परिपूर्ण आणि कृतार्थ जीवन व्यतीत करत आहे

~ लेखक ~
श्री. संजय वसंतराव नलावडे
धोलवड, मुंबई

Related posts

*वाशी वाहतूक शाखेची २०२५ मध्ये कडक कारवाई; ६८ हजारांहून अधिक केसेस, कोट्यवधींचा दंड वसूल*

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा*

jantechasavdhanmaharashtra

*वाशी वाहतूक विभागाची विशेष मोहीम; २६५ वाहनचालकांवर कारवाई*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment