*ऐरोलीत मंदिर दानपेटी फोडणारा चोर ‘गजाआड’ — रबाळे पोलिसांचा आठ दिवसांचा गुप्त सापळा यशस्वी*
नवी मुंबई (प्रतिनिधी) : ऐरोली परिसरात सलग तीन मंदिरांचे दरवाजे फोडून दानपेट्यांतील रक्कम लंपास करणाऱ्या चोराला रबाळे पोलिसांनी अखेर गजाआड केले. आठ दिवसांच्या सावजावर टेहळणी, सीसीटीव्ही फुटेजचा तांत्रिक तपास आणि मध्यरात्री रेल्वे स्थानकावर टाकलेला सापळा या अखंड पाठपुराव्यानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
*गुन्ह्याची धक्कादायक मालिका*
6 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे दत्त गुरु सेवा मंडळाच्या दत्त मंदिरात अज्ञात चोर शिरला. दरवाजाची कडी तोडून लोखंडी दानपेटी फोडली आणि 15 ते 20 हजार रुपये रोख रक्कम घेऊन फरार झाला. यानंतर, त्याच आठवड्यात आणखी दोन मंदिरांमध्ये अशाच पद्धतीने चोरी झाली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
**तपासाची नाट्यमय मोहीम**
फिर्याद मिळताच रबाळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज झडती घेतली. आरोपीचा चेहरा स्पष्ट करण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आला. त्याच्या हालचालींचा मागोवा घेत सलग आठ रात्री गुप्त सापळा लावण्यात आला. अखेर 11 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.15 वाजता ऐरोली रेल्वे स्थानकावर आरोपी **अनिमेष शुभल घोष (वय 30, मूळ हावडा, कोलकाता)** यास शिताफीने पकडण्यात आले.
*उघडकीस आलेले गुन्हे*
1. रबाळे CR No. 599/25 — BNS 331(4), 305
2. रबाळे CR No. 602/25 — BNS 331(4), 305
3. रबाळे CR No. 603/25 — BNS 331(4), 305
हाती लागलेला मुद्देमाल
दानपेट्यांतील रोकड, लोखंडी हत्यारे आणि गुन्ह्यातील कपडे पोलिसांनी जप्त केले.
*कारवाईतील हिरो पथक*
सपोनि अविनाश पाळदे, पो.हवा/2330 प्रसाद वायंगणकर, पो.ना/3447 विजय करंकाळ, पो.ना/2992 प्रल्हाद जाधव, पो.शि/3552 राहुल साळुंखे, पो.शि/3204 राजेश तडवी, पो.शि/3577 प्रवीण भोपी, पो.शि/3897 अभिजित राळे.
या मोहिमेचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या काटेकोर नियोजनामुळे आणि तांत्रिक तपासाच्या अचूकतेमुळे सलग तीन गुन्ह्यांचा गुंता उलगडला.

