**द्रोणागिरी नोडमध्ये 20 एकरवरील अतिक्रमणावर यशस्वी कारवाई; भूखंड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताब्यात**
नवी मुंबई : राज्य शासनाने नवी मुंबई प्रकल्पाच्या विकासासाठी ठाणे, पनवेल व उरण तालुक्यांतील 95 गावांतील गावठाण वगळून उर्वरित क्षेत्र सिडको महामंडळास नवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 नुसार, सिडकोकडे अधिसूचित 95 गावांतील संपादित जमिनीवरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे काढण्याचे अधिकार आहेत.
या पार्श्वभूमीवर सिडकोच्या व्यवस्थापक (शहरसेवा-3) यांच्या 13 मार्च 2025 रोजीच्या पत्रानुसार, द्रोणागिरी नोडमधील सेक्टर-1 व 2 येथील 20 एकर भूखंड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास कास्टींग यार्डसाठी प्रदान करण्यात आला आहे. दिनांक 21 मार्च 2025 रोजी झालेल्या स्थळपाहणीत सदर भूखंडावर कंटेनर, केबिन, पत्राशेड, हॉटेल व पार्किंग अशा स्वरूपातील अतिक्रमण आढळून आले. ही अतिक्रमणे श्री. जितेंद्र पाटील, श्री. अविनाश घरत, श्री. मंगेश पाटील व श्री. दत्ता भिवा ठाकूर यांच्या नावाने असल्याचे निष्पन्न झाले.
या अतिक्रमण धारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 53(अ)(1) अंतर्गत 24 तासांची नोटीस दिनांक 24 मार्च 2025 रोजी देण्यात आली होती. यानंतर, श्री. जितेंद्र पाटील, श्री. मंगेश पाटील आणि श्री. दत्ता भिवा ठाकूर यांनी स्वयंप्रेरणेने अतिक्रमण हटवले. मात्र, श्री. अविनाश घरत यांनी अतिक्रमण न हटवल्यामुळे दिनांक 21 मे 2025 रोजी सिडकोच्या अतिक्रमण विभागामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग, स्थानिक पोलीस अधिकारी, सिडको पोलिस पथक, सिडको व महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या समन्वयाने करण्यात आली. कारवाई दरम्यान 01 पोकलेन, 02 जेसीबी, 01 ट्रक, 08 जीप आणि 20 कामगारांची मदत घेण्यात आली.
यशस्वीपणे अतिक्रमण हटवून सदर 20 एकर भूखंड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात आला असून, विकास कार्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

