*वाशी वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; नियमभंगावर कडक कारवाई करत रस्ते सुरक्षेला प्राधान्य*
राजेंद्र बोडके (जनतेचा सावधान महाराष्ट्र)
वाशी, नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक विभागाच्या मार्गदर्शनाखाली वाशी वाहतूक शाखेने डिसेंबर २०२५ मध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रभावी व कडक कारवाई करून शिस्त आणि रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पोलीस उप आयुक्त (वाहतूक) नवी मुंबई तिरुपती काकडे यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली.
दि. ०१/१२/२०२५ ते दि. १४/१२/२०२५ या कालावधीत दारू पिऊन वाहन चालवणे, रहदारीस अडथळा निर्माण करणारी वाहने तसेच नो-पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात आली. या कालावधीत एकूण ३२०८ प्रकरणांमध्ये कारवाई करून २१,३७,६५० रुपयांची दंड आकारणी करण्यात आली असून २,८३,५०० रुपयांचा प्रलंबित दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या २२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित २२ चालकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या ६७२ वाहनचालकांविरोधात मा. न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.
याशिवाय वाशी परिसरातील गर्दीची ठिकाणे, शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रबोधन कार्यक्रम राबवून सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मद्यपान करून वाहन चालवू नये याबाबत ठोस संदेश देण्यात आला आहे.
वाशी वाहतूक पोलिसांनी शासकीय कार्यपद्धतीनुसार काटेकोर नियोजन, तत्पर अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून भविष्यातही अशीच कठोर व सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहणार असल्याचे वाशी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम यांनी
सांगितले

