Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*सिडकोची घरे १० टक्क्यांनी स्वस्त; १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना जाहीर*

*सिडकोची घरे १० टक्क्यांनी स्वस्त; १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना जाहीर*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, सिडकोच्या विविध प्रवर्गातील घरांच्या किंमतींमध्ये थेट १० टक्के कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांना मोठा लाभ होणार आहे.

सिडकोतर्फे वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या महत्वपूर्ण नोड्समध्ये उभारण्यात आलेल्या १९,००० घरांची महागृहनिर्माण योजना दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी www.cidcohomes.com या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सिडकोच्या घरांच्या किंमतींमध्ये १० टक्के कपात करण्याचा निर्णय हा सामान्य माणसाच्या घराच्या स्वप्नाला बळ देणारा आहे. नवी मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे स्वतःचे घर असावे, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, सिडकोच्या घरांच्या किंमतींमध्ये करण्यात आलेली कपात ही सर्वसमावेशक आणि परवडणाऱ्या गृहनिर्माण उद्दिष्टांशी सुसंगत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे लाखो अर्जदारांना घर स्वस्त दरात मिळण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी माहिती देताना सांगितले की, “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या योजनेअंतर्गत बामणडोंगरी, कळंबोली, खारकोपर, खारघर, खांदेश्वर, मानसरोवर, पनवेल, वाशी आणि तळोजा या सर्व नोडमधील घरांच्या किंमती देखील १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. ही सुधारित किंमत विद्यमान लाभार्थी तसेच भावी अर्जदारांना लागू राहणार आहे.

अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घरे अधिक परवडणारी ठरणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या २.५ लाख रुपयांच्या अनुदानासोबतच १० टक्के स्वस्त किंमतींचा दुहेरी लाभ मिळणार आहे. त्यामुळे घरखरेदीचा एकूण आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

तसेच १९ फेब्रुवारी २०२५ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरूनही ज्यांनी घरे सरेंडर केली होती, अशा अर्जदारांनाही सुधारित अटींनुसार पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित अर्जदारांना घर निश्चित करण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यांनी https://cidcohomes.com या संकेतस्थळावर भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चार विभागीय अधिवेशने यशस्वी

केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपये सूट द्यावी

मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळणार ; केंद्रात तीन मंत्रीपदे, ‘या’ नावाची चर्चा

Leave a Comment