नवी मुंबई परिवहन कार्यालयाचे चाचणी केंद्र नेरूळ येथे उपलब्ध करण्यात यावे ! निलेश कचरे

नवी मुंबई:-( प्रतिनिधी)
नवी मुंबई शहराची देशात उत्तम नियोजीत शहर म्हणून एक नावलौकिक ओळख आहे. वाढती लोकसंख्या व त्यांच्या नियोजनसाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाने अनेक सेवा सुविधा शहरात उपलब्ध करून दिल्या आहेत. यापैकी शहरातील नागरिकांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय देखील (MH-43) २००४ पासून सेवेत आहे. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथील जागेत भाडेतत्वावर २ दशके कार्यालयाचा कारभार चालत होता. सेक्टर १९ येथील “T- BLOCK” येथे कार्यालयीन कामकाज तर मसाला बाजार समिती शेजारी चालक चाचणी मैदान (RTO TEST GROUND) असा परिवहन कार्यालयाचा कारभार चालू होता. परंतु कार्यालयीन ईमारत जुनी व भाडेतत्वावर असल्यामुळे राज्य सरकारच्या पुढाकारातून नेरूळ सेक्टर १३ येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन शासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला.
सदर कार्यालयाचे कामकाज जानेवारी २०२४ पासून नेरूळ येथील नूतन इमारतीत चालते. तसेच वाहन तपासणी केंद्र हे नेरूळ पूर्व सेक्टर १९/अ येथील मैदानात चालते. परंतु देशभरात नागरिकांच्या शासकीय कामांसाठी एक खिडकी योजना म्हणजेच नागरीकांचा वेळ व गैरसोय दुर करण्यासाठी सर्व शासकीय कामे एकाच ठिकाणीं करण्यात येतील अशी संकल्पना राज्यभर राबवली जात आहे. परंतु नवी मुंबई परिवहन कार्यालयात वाहन चालक चाचणी केंद्र वाशी येथे असल्यामुळे चाचणी झाल्यानंतर नागरीकांना त्यांचे अभिलेख जमा करण्यासाठी नेरूळ येथे यावे लागते अश्यात नागरीकांचा अमूल्य वेळ वाया जात असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. नेरूळ सेक्टर १३ येथील नवीन परिवहन कार्यालयाच्या मागील बाजूस सिडकोच्या सांकेतिक स्थळावर भला मोठा भूखंड उपलब्ध असून सदर भूखंड हा परिवहन चाचणी केंद्र यासाठी राखीव होवू शकतो अशी तरतूद सांकेतिक स्थळांवर दर्शवित आहे. तरी सदर मोकळा भूखंड हा परिवहन कार्यालयाच्या चाचणी केंद्रासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात यावा व परिवहन कार्यालयाचा उर्वरित मैदानी कारभार याचा भूखंडावर कार्यान्वित करण्यात यावा जेणेकरून शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मोठी मदत होईल.
शहरातील जनतेच्यावतीने आपणास नम्र विनंती करण्यात येते असे पत्र सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी परिवहन मंत्री व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे , नेरूळ सेक्टर १३ येथील परिवहन कार्यालयाच्या मागील बाजूस असलेला भला मोठा मोकळा भूखंड परिवहन चाचणी केंद्रासाठी देण्यात यावा हिच नम्र विनंती. आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया लेखी स्वरूपात अपेक्षित असून जनतेच्या विकासासाठी आपले सहकार्य अपेक्षित. असे मत पत्राद्वारे निलेश कचरे यांनी दिले आहे असे पत्रकारांना बोलताना सांगितले आहे


