*नवी मुंबई महापालिका निवडणूक : प्रभाग १८ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
वाशीगाव, नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला तसेच उमेदवारांचे प्रचार पत्रक प्रकाशनही करण्यात आले.
येणाऱ्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १८ मधील भाजप उमेदवार दशरथ भगत, निशांत भगत, प्रीती संदीप भगत व दयावती संपत शेवाळे यांच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली. यावेळी वाशीगाव, सानपाडा-पामबीच मार्ग परिसर तसेच वाशी सेक्टर १७ मधील मोठ्या संख्येने मतदार नागरिक आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित जनतेला संबोधित करताना सागर नाईक यांनी सांगितले की, नवी मुंबईतील सुजाण मतदारांनी नेहमीच विकासात्मक दृष्टिकोनाला पाठिंबा दिला आहे. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ना. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केलेली कामे सर्वश्रुत आहेत. बाहेरील पक्षांनी शहराच्या कररूपी निधीचा योग्य वापर न करता नवी मुंबईला विकासापासून वंचित ठेवले, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दशरथ भगत यांनी महापालिकेत केलेल्या लोकोपयोगी कार्याचा आढावा मांडण्यात आला. भगत कुटुंबाने गेल्या तीन दशकांत केलेली समाजसेवा लक्षात घेता या कुटुंबाला जनतेकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. युवा नेतृत्व म्हणून निशांत भगत हे निवडून आल्यास प्रभागासह संपूर्ण नवी मुंबईतील युवकांसाठी प्रभावी व सकारात्मक काम करतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
महिला उमेदवार प्रीती संदीप भगत या उच्चशिक्षित असून त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा लाभत आहे. तसेच अनुभवी लोकप्रतिनिधी म्हणून दयावती संपत शेवाळे यांच्या अनुभवाचा लाभ प्रभागातील विकासकामांसाठी निश्चितच होईल, असे आश्वासन सागर नाईक यांनी मतदारांना दिले.
दीर्घ अनुभव असलेले उमेदवार दशरथ भगत यांनी आपल्या मनोगतातून नवी मुंबईच्या शाश्वत व कायमस्वरूपी विकासासाठी ना. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. नवी मुंबईच्या विकासासाठी ही निवडणूक निर्णायक ठरेल, असा सूर या प्रचार शुभारंभात स्पष्टपणे दिसून आला.

