माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय क्रमांकाची मानकरी
प्रतिनिधी :-जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई महानगरपालिका हिने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर पुन्हा एकदा मानाचा तुरा मिळवला आहे. महाराष्ट्र शासन यांच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई शहराने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
मुंबई येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार पंकजा मुंडे यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी सचिव जयश्री भोज,अतिरिक्त आयुक्त राहुल गेठे तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याच समारंभात महानगरपालिकेला मागील दोन वर्षांतील म्हणजे माझी वसुंधरा अभियान 4.0 आणि 5.0 या दोन्ही अभियानांचे द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच अभियान 4.0 अंतर्गत भूमी थीमॅटिक कॅटेगरीत राज्यस्तरीय सर्वोत्तम कामगिरीचे विशेष पारितोषिक मिळाल्याने एकूण तीन पुरस्कारांचा मान शहराला मिळाला आहे.
महापौर सुजाता पाटील यांनी हा सन्मान नागरिक, स्वयंसेवी संस्था, कर्मचारी व प्रसारमाध्यमांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. उपमहापौर दशरथ भगत यांनी या पुरस्कारामुळे शहराच्या पर्यावरणीय कामगिरीला अधिक प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुढील काळात डेटा-आधारित मॉनिटरिंग, हरित आच्छादन वाढ, जलस्रोत संवर्धन आणि हवा गुणवत्ता सुधारणा यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
पंचतत्वांवर आधारित या अभियानात शहराने विविध क्षेत्रांत प्रभावी उपक्रम राबवले. हरित आच्छादन वाढविण्यासाठी स्थानिक प्रजातींची वृक्षलागवड, जिओटॅगिंगसह वृक्षगणना, जैवविविधता नोंदवही तयार करणे आणि बीज संकलन केंद्रांची उभारणी करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापनात स्त्रोतस्थळी वर्गीकरण, कंपोस्टिंग, ई-कचरा व बायोमेडिकल कचऱ्याचे स्वतंत्र व्यवस्थापन आणि सिंगल यूज प्लास्टिकविरोधी कठोर अंमलबजावणी करण्यात आली.
वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी ईव्ही धोरण, चार्जिंग स्टेशन, सायकल ट्रॅक व जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या. जल व्यवस्थापनासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग, भूजल पुनर्भरण, जल लेखापरीक्षण आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवले गेले. ऊर्जा क्षेत्रात सौर प्रकल्प, हरित पथदिवे व ऊर्जा लेखापरीक्षणाद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात आला.
जनसहभाग वाढवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांतील पर्यावरण उपक्रम, ई-प्रतिज्ञा, स्वयंसेवी संस्था व CSR माध्यमातून समुदाय आधारित कार्यक्रम राबवले गेले. या सर्वसमावेशक उपक्रमांमुळेच मोठ्या शहरांच्या गटात सलग दुसऱ्या वर्षी राज्यात द्वितीय क्रमांक मिळवण्याचा मान नवी मुंबईला मिळाला आहे.

