अनधिकृत होर्डिंग विरोधी कारवाई दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत प्रभावीपणे सुरू
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात आली असून घणसोली, कोपरखैरणे व तुर्भे विभागातील पाच मोठे होर्डिंग हटवण्यात आलेले आहेत.
अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व त्यांचे अधिनस्त सहकारी यांनी तांत्रिक समुहासह अनधिकृत होर्डिंग हटाव मोहीम सलग दोन दिवस पहाटेपर्यंत प्रभावीपणे राबवली.
घणसोली विभागात ठाणे बेलापूर सर्विस रोड येथे हॉटेल रामडा, औरम निवासी संकुल येथील 2 मोठे होर्डिंग निष्काषित करण्यात आले.
त्याचप्रमाणे ठाणे बेलापूर रोडवर कोपरखैरणे विभागात एमआयडीसीच्या फायर ब्रिगेड जवळ असलेले फार मोठ्या आकाराचे होर्डिंगही हटविण्यात आले.
तुर्भे विभागामध्ये एपीएमसी मार्केट येथील एक मोठे अनधिकृत होर्डिंग तसेच तुर्भे रेल्वे स्टेशन नजीकची पदपथावर असलेली दोन मोठी अनधिकृत होर्डिंग पहाटेपर्यंत काम करून निष्कासित करण्यात आली. आजही वाशी विभागात हायवेनजिकचे मोठे होर्डींग निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
विभाग कार्यालयांमार्फत त्यांच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येणार आहे असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी स्पष्ट केले.




