
विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती
कोपरखैरणे:-प्रतिनिधी
कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या वतीने कोपरखैरणे, घणसोली परिसरामधील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सोमवारी वाहतूक शाखेने कोपरखैरणे येथील सेंट मेरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती दिली व नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात आले.
नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी, कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या वतीने नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रमराबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी कोपरखैरणे येथील सेंट मेरी स्कूलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले व वाहतूक नियमांबाबत चित्रफिती दाखवून वाहतुकीचे नियम पाळल्यास आपण स्वतः व इतरांना कसे सुरक्षित ठेवू शकतो, याबाबत मार्गदर्शन केले.
अपघात कसे घडतात आणि अपघात कसे टाळता येऊ शकतात, यासाठी आपण स्वतः व इतरांनी वाहतुकीचे नियम कसे पाळायचे याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वाहतुकीचे नियम पाळताना काय खबरदारी घ्यावी याबाबत माहिती दिली. वाहतुकीच्या नियमांबाबत विद्याथ्यर्थ्यांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन देखील करण्यात आले. यावेळी या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थी उपस्थित होते.

